मुख्यमंत्र्यांची गतिशीलता

Web Desk Team

मराठी वृत्तवाहिन्यांतून काम करणाऱ्या केतकी चितळे नावाच्या नटीने तिच्या सोशल मीडिया पेज वरून व्हिडीओ अपलोड केले होते. मुळात ते दोन्ही व्हिडीओ अतिशय सुमार दर्जाचे आणि उथळ होते. केतकी चितळे यांनी त्यापैकी एका व्हिडीओ त ‘हिंदी’ राष्ट्रीय भाषा असल्याची चुकीची माहिती प्रसारित केली. मराठीप्रेमींनी आपले झेंडे फडफडत येऊ नये , असा उलटसल्ला दिला. त्याचे परिणाम म्हणून केतकी चितळे फेसबुकवर प्रचंड ट्रोल झाली. अनेक बावळटांनी अश्लाघ्य भाषेचा प्रयोग केला. एखाद्या स्त्रीला अश्लाघ्य भाषेत ट्रोल करणे निःसंशय चुकीचे आहे. त्याचे समर्थन अजिबात होऊ शकत नाही. पण ह्या सगळ्यात लक्षवेधी ठरते ती ,मुख्यमंत्र्यांची भूमिका.

Pic Courtesy: ज्ञानप्रवाह

केतकी बाई, न्यायासाठी थेट वर्षा बंगल्यावर गेल्या. मुख्यमंत्र्यांनी देखील ताबाडतोब , केतकीला ट्रोल करणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले. मुख्यमंत्री गृहखातेपण सांभाळतात, त्यामुळे त्यांनी दिलेल्या आदेशांना विशेष महत्व आहे. केतकी चितळेला अश्लील शिवीगाळ करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. केतकी चितळे काहीही बोललेली असो, कसेही बोलो पण ती एक स्त्री आहे आणि तिची प्रतिष्ठा जपलीच पाहिजे. केतकी चितळे प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन; पण गृहमंत्री म्हणून अशीच तत्परता ते इतर प्रकरणांत दाखवू शकलेत का ?, हा चिंतनाचा विषय आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रभरात अनेक खळबळजनक घटना घडल्या. कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली. पण फडवणीस यांची तत्परता मात्र कायम प्रसारमाध्यमांना केंद्रबिंदू मानत आली आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर हिंसाचार झाला. प्रसारमाध्यमे हिंदुत्ववादी संघटनांना लक्ष करीत होती. मुख्यमंत्र्यांनीदेखील लगोलग हिंदुत्ववाद्यांचे बळी दिले. सुदैवाने त्यातील सत्य लवकर बाहेर येऊ शकलं. पालघर येथे काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या विहिप शिबिराच्या बाबतीत तसंच काहीसं झालं. वस्तुतः विहिप शिबिरात शस्त्रास्त्रे प्रशिक्षण वैगरे काही नव्हतंच. पण प्रसारमाध्यमांनी तशा बातम्या लावल्या . परिणामस्वरुप विहिप कार्यकर्त्यांना फडणवीसांच्या गृहखात्याने अटक केली. मध्यंतरी राज ठाकरेंना ट्रोल केले म्हणून तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकांना धमकवण्याचे , मारहाणीचे प्रकार झाले होते. तेव्हा मुख्यमंत्रि महोदय आणि त्यांचं गृहखात काय करत होत ? हा संशोधनाचा विषय आहे. विशेषतः मार खाणारे अनेक जण मोदी समर्थक होते.

आज जशी तत्परता केतकी चितळेसाठी मुख्यमंत्र्यांनी दाखवली तितकंच दक्षपणा इतर प्रकरणांत देखील दाखवायला हवा. केतकी चितळे सेलिब्रिटी आहे आणि प्रसारमाध्यमांची लाडकी आहे म्हणून तिला झटपट न्याय मिळणार असेल तर मग सामान्य माणसाने सोशल मीडिया वापरू नये का? मुख्यमंत्र्याची गतिशीलता सामान्य प्रकरणांतही तितकीच असावी जितकी ती चितळे प्रकरणात आहे.

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *