ऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व

By Makrand Mulay

सुषमा स्वराज यांचे नेतृत्व आणिबाणीच्या काळात उदयास आले होते. आता त्यांची ओळख अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या म्हणून करून दिली जात असलीतरी त्या मूळच्या त्यावेळच्या जनता पक्षाच्या गोतावळ्यातील होत्या. आणीबाणी विरोधी लढा, जनता पार्टीची स्थापना या काळात सक्रिय झालेली तत्कालीन युवाशक्तीने समाजवादी, डावी विचारसरणीच्या जोखडातून सुटका करून घेण्यास सुरुवात केली होती. हे जोखड टाकून त्यावेळच्या जनता पार्टीत विसर्जित झालेल्या जनसंघात ज्याच्यावर दुहेरी सदस्यत्वाचा पोरकट, हास्यास्पद आरोप लावला तिकडे आकर्षित झाली होती. ही युवा शक्ती जनता पार्टीच्या रूपातील पहिले बिगरकाँग्रेसी सरकार कोसळल्यावर स्थापन झालेल्या भाजपकडे वळली होती. राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांचे अनुयायी समाजवाद म्हणजे “हिंदू, संघ, भाजप विरोध” अशी भूमिका घेत होते. भाजप विरोधासाठी कॉंग्रेसला सहकार्य करू लागले होते. त्यामुळे काँग्रेसला पर्याय म्हणून उभा रहाणार समाजवाद आकुंचन पावत होता. डावे तर केवळ हिंसेच्या, वर्ग संघर्षाच्या आधारे विस्तारू इच्छित होते. विदेशी मार्क्सवाद पेरून राजकारण करू इच्छित होते. त्याकाळात डोळसपणे वैचारिक भूमिका समजून घेऊन सुषमा स्वराज संपूर्णत: भाजपमय झाल्या होत्या. त्यांच्या देहबोलीतून, कामातून, वक्तृत्वातून सहजपणे राष्ट्रीय भाव व्यक्त होत होते. कुटुंबवत्सलता त्यांच्यातून व्यक्त होत होती. वयाच्या पंचविशीत आमदार आणि तरुण मंत्री म्हणून हरियाणा विधानसभेत राजकीय कारकिर्द सुरू करणाऱ्या मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यरत होत्या. “राष्ट्र प्रथम” या भूमिकेतून त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून आपला ठसा उमटविला आहे. त्यांचे शेवटचे ट्विट राष्ट्रीयत्वाचे प्रकटीकरण करणारे ठरले आहे. ऋजुता आणि ठामपणा याचे संतुलन त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या मांदियाळीत सुषमा स्वराज यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण होते. राज्यसभेत आणि लोकसभेत ३७० कलम रद्द झाल्याचे आनंदी समाधान घेणाऱ्या सगळ्यांनाच सुषमा स्वराज यांचे जाणे वेदना देणारे आहे. त्यांना सगळेच जण श्रध्दांजली वहात आहेत. मात्र, अश्या दुःखद प्रसंगी मोदी काविळीने ग्रस्त असलेले मोदी विरुद्ध स्वराज अश्या स्टोऱ्या आवर्जून सांगत आहेत. (अटलजींच्या मृत्यूनंतर अश्याच काही मुद्यांवर काही माध्यमवीर बरळत होते.) परराष्ट्र मंत्री म्हणून काम करणाऱ्या सुषमा स्वराज यांना पंतप्रधान मोदी यांनी ‘डॉमीनेट’ केले होते. त्यांना ‘फ्री-हँड’ दिला नव्हता. महत्वपूर्ण निर्णयात सहभागी करून घेतले करून घेतले नव्हते. हे आणि असं श्रध्दांजलीच्या लेखातून मांडले जाईल. याबाबत सोशल मीडियावर प्रदूषण करण्यात सुरुवात झाली आहे. मात्र, मोदींनी काम न करू दिलेल्या सुषमा स्वराज यशस्वी, लोकप्रिय परराष्ट्र मंत्री म्हणून का गौरविल्या जात आहेत ? असा प्रश्न या मोदीग्रस्तांना विचारल्यावर नेहमीप्रमाणे गोल पोस्ट चेंज करण्याचा खेळ खेळतील. भाजप आणि भाजपच्या विचारांना स्त्रीविरोधी ठरवून आपल्या फेमिनिझमची हौस भागवून घेणाऱ्यांनी सुषमा स्वराज यांचे भाजपातील स्थान, त्यांचा प्रभाव आणि त्यांनी पक्षात प्रतिबिंबित केलेले भारतीय स्त्री-जीवनाचे भावविश्व याची माहिती घेऊन प्रामाणिक विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्त्री शक्तीचे जागरण करणाऱ्या सुषमा स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली. – मकरंद मुळे ©

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *