उमद्या कलावंतांना दहशतवादी बनवणारे कलापथक

प्रिया सामंत

आपण लावलेल रोपटं तरारून हिरवं व्हावं; आपल्यापेक्षाही मोठं होतं, मध्यान्हीच्या ऊन्हात त्यानं आपल्याला, त्याच्या दाट सावलीला घ्यावं; त्याच्या पानाफुलांच्या मोहात आपली सांझ केशरगुलाबी व्हावी अन आपण निजल्यावर, आपल्याच मातीनं पुन्हा एकदा त्याची मूळं घट्ट करावीत असं लोभस चित्र सारीच जोडपी रंगवतात.

गरीब-श्रीमंत.. बाप कुणीही असला तरी आपल्या लेकरात तो आपली काठी शोधतोच. एकटेपणाचा श्राप असलेल्या म्हातारपणात तोच एक आधार वाटतो.

झोपडीतल्या स्वप्नांना तर इवल्याशा मुठीतंच चंद्र गवसतो आणि अश्यात हातातोंडाशी आलेलं आपलं लेकरू जेंव्हा अचानक दृष्टी आड होतं तेंव्हा फाटक्या प्राक्तनाने दगड झालेला बापही पोलिसांसमोर आई होऊन रडतो!

असंच काहीसं ह्या बेपत्ता मुलांच्या बाबतीत होतं.

चित्रकला, संगीत, अभिनय वा लेखणीतून व्यक्त होण्याची कला अंगात असते. वय अजाण-अबोध असतं. अश्यात पथ नाट्य घेऊन कलाकारांच्या वेशात काही सोंगाडी येतात आणि शहरातल्या गरीबवस्तीतल्या छोट्या कलाकारांना नादी लावतात.

“शिक्षण घेऊन काय होणार? त्यापेक्षा दैवी कलेला वाव मिळू दे” अशी भूल घालत जन्मदात्यांची ईच्छा-स्वप्न, संस्कार-शिकवण कोवळ्या मनातून कायमचे पुसले जातात. आपल्यातल्या कलेची कदर करणारं कुणी जाणतं आपल्याला सापडलंय ह्या विश्वासावर हे छोटे कलाकार घरट्यातून बाहेर पडतात. गरिबीने निगरगट्ट झालेली ही मुलं आईवडिलांना सोडून अश्या सोंगाड्यांच्या मागे अगदी सहज जातात; कायमची बेपत्ता होतात!

आणि मग अचानक आठ-दहा वर्षांनी कधी अशीच एखादी बातमी पेपरात झळकते. बेपत्ता झालेल्या पोराचं नाव, फोटो-पत्त्यासकट बातमीत छापलेलं असतं. त्या छोट्या कलाकाराच्या हातात आता एक रायफल आलेली असते. कागदावर विविध रंगी स्वप्न सजवणारं ते पोरं आता जंगलातल्या ‘लाल क्रांतीसाठी’ वनवासी बांधवांना वेठीस धरणारा Maoist, हातात बंदूक घेऊन आपल्या पोलिस जवानांना लक्ष्य करणारा आतंकवादी, ATSचा Wanted Terrorist झालेला असतो!

मोठं झालेलं ते झाड आपलीच मूळं खणत असतं!

नऊ वर्षांपूर्वी पुण्याच्या गरीब वस्तीतल्या संतोष शेलार आणि प्रशांत कांबळे ह्या तरुण कलाकारांना कबीर कला मंचच्या सोंगाड्यानी हेरले आणि “मुंबईला चित्रकला प्रदर्शनात काम करण्याची संधी आहे” असे सांगून त्यांना आपल्या घरच्यांपासून कायमचे तोडले.

पुढे मे 2014 मध्ये गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत claymore mines सारखे सुरुंग, दुर्गम भागात संपर्कासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक walkie-talkies यांसोबत माओवादाला बढावा देणारे काही लेखन साहित्य, चित्र सापडली. शरणागत माओवाद्यांनी ती संतोषने उर्फ विश्वाने काढलेली असल्याचा दुजोरा दिला. चित्रकलेच्या कौशल्यामूळे ओळखला जाणारा हा माओवाद्यांचा विश्वा पेंटर, 25 मार्च 2019च्या छत्तीसगड पोलिसांच्या पाहणी अहवालानुसार, माओवादी गुरील्लांच्या यादीत “सक्रिय माओवादी” म्हणून समोर आला. माओवादी विचारप्रणालीला पूरक अशी चित्र रंगवणारा विश्वा पेंटर आता “तांडा एरिया कमिटी”चा “डेप्युटी कमांडर” झाला होता!

एक कलाकार खरंच बेपत्ता होता!

संतोष सोबत गायब झालेल्या प्रशांत कांबळेनेही आपली जुनी ओळख पुसून माओवाद्यांनी दिलेलं “मधु” नाव जवळ केलं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करण्याचं आपलं कौशल्य माओवादी कॅडरमध्ये देशविघातक योजना तडीस नेण्यात व्यर्थ घालवलं!

कोरेगावभीमा प्रकरणी प्रकाशात आलेल्या कबीर कला मंचचा, कलाकार शहरी तरुणांना पोलिस डायरीत बेपत्ता घोषित करवून माओवादी क्रांतीच्या नावे अपराधाच्या दलदलीत ओढण्याचा प्रकार जुना आहे आणि असे असूनही कबीर कला मंच विरोधात इतकी वर्षे कुठलीही ठोस कारवाई शासनाने केली नाही.

पथ नाट्य करून बुद्धिभेद करणारे, तरुणांना जंगलातल्या नक्षलवादात अडकवणारे हे शहरी ढोंगी समाज सुधारक इंटरनेट सोशल मिडियावरून आजच्या तरुणांच्या संपर्कात येणेही खरंतर सहज शक्य आहे.

आपल्या देशाच्या प्रगतीपथावर सुरुंग पेरत, सुरक्षा रक्षकांवर गोळ्या झाडत देशाचे कित्येक कलाकार जंगलात कायमचे हरवले असताना, समाज जागृतीच्या नावाखाली आपली तरुण पिढी नासवणाऱ्या ह्या सोंगाड्यांच्या विरोधात कारवाई करणारे राज्यशासनही कदाचित ‘बेपत्ता’ आहे!

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *