या ममताचे डोके ठिकाणावर आहे काय?


बंगाल. कालीमातेच्या पुजाऱ्याचा, चैतन्य महाप्रभूंचा, अरविंद घोषांचा, वंदे मातरम लिहिणाऱ्या बंकिमचंद्रांचा, सातासमुद्रापार जाऊन आपल्या संस्कृतीचा झेंडा फडकावणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा, तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा म्हणणाऱ्या सुभाषचंद्र बोसांचा. इतकंच काय पण क्रिकेटच्या मैदानातही साहेबांच्या अरे ला कारे करणाऱ्या निडर आणि चतुरस्त्र कर्णधार सौरव गांगुलीचा बंगाल. पारतंत्र्यात असलेल्या या भारत राष्ट्राला पुनर्जागृती देणारी हे वंगभूमी. क्रांतीकारी विचारांचा मलिदा संपूर्ण देशाला वाटणारा हा बंगाल ज्याचं आज तारखेला नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं ते एकच नाव म्हणजे “मालदा”. आणि दुसरं नाव येतं ते म्हणजे ममता.

आज थोडी सुद्धा सामाजिक विषयांची जाणीव असणारा माणूस पश्चिम बंगाल मधल्या चाललेल्या गोष्टींवर विचार करणार नाही असं होणारच नाही. सामान्य माणूस हा कधी झापडं लावून चालत नाही. त्याने आपलं मत मांडलं नाही असं होणं शक्य असलं तरी सामान्य माणसाला स्वतःच असं मतच नसतं असा त्याचा अर्थ होत नाही. आणि म्हणूनच पश्चिम बंगालमध्ये जे काही प्रकार चालू आहेत त्याला पाहता या प्रकारांना अराजकाच म्हणावे लागेल. आजची परिस्थिती पाहता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची तुलना सुहरावर्दीशी केल्यास त्याचं नवल वाटण्याचं काहीही कारण नाही.

बंगालच्या भूमीवर काही आज नव्याने अत्याचार होतायत असं नाही. यामागचा इतिहास हा शतकानुशतके जुना आहे. १७५७ ला प्लासीचं युद्ध झाल्यापासूनच बंगाल इंग्रजांचे आणि त्यांच्या गुलामगिरीचे चटके सोसत होता. पण वाईटातूनही चांगलंच घडतं असं म्हणतात हे काही खोटं नाही आणि यामुळेच स्वातंत्र्यचळवळीची बीजं हीसुद्धा याच मातीत रोवली गेली. तरीही अडचणींमध्ये कमतरता ही कधी नव्हतीच. फोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या नीतीचा पहिला फटका जर कोणाला बसला असेल तर तो बंगालच्या भूमीला बसला. १९०५ साली प्रशासकीय कारणं पुढे करून बंगालचा तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड कर्झन बंगालचा जणू कर्दनकाळच बनून आला. बंगालच्या भूमीचे दोन तुकडे पाडण्याची शक्कल लढवून बंगालमध्ये जातीय दंगली आणि अशांतता माजवून स्वातंत्र्यचळवळ शांत करता येईल हीच यामागे गोऱ्यांची शक्कल होती. तरीही देशभक्त बंगाली या दबावापुढे झुकला नाही आणि हिंदू बंगाली भद्रलोक ज्यामुळे बंगालात व्यापारउदीम आणि गावगाडा समृद्धपणे चालत होता तो या वंगभंगामुळे पेटून उठला आणि ब्रिटिशांचा हा डाव हिंदूंनी उधळून लावला. बंगालची फाळणी ही वरवर जरी प्रशासकीय वाटत असली तरीही मुस्लिमबहुल असलेल्या पूर्व बंगाल आणि हिंदुबहुल असलेल्या पश्चिम बंगालची धर्मावर आधारित सरळ सरळ फाळणी करण्याचा मानस हा कर्झनचा होता. आणि त्याचं संकट १९०५ साठी जरी टाळलं गेलं असलं तरीही ते दुखणं १९४७ ला पुन्हा उसळून वर आलंच आणि फाळणीअंतर्गत तोच पूर्व बंगाल हा पाकिस्तानला पूर्व पाकिस्तान म्हणून देण्यात आला पण तोसुद्धा बंगालमध्ये रक्तरंजित होळी खेळल्यावरच. पाकिस्तानचे सो कॉल्ड कायदे आजम असलेले जिनाह (कारण भारतात हे स्थान बाबासाहेबांचं आहे. भारत जिन्हाला कायदे आजम मानूच शकत नाही.) आणि एच एस सुहरावर्दी यांनी डायरेक्ट ऍक्शन डे च्या गोंडस नावाखाली हिंदूच्या सरळसरळ कत्तली सुरु केल्या आणि त्यामुळेच प्रतिकार म्हणून नौखालीमध्ये दंगली उसळल्या. याच बंगालला स्वातंत्र्यानंतरसुद्धा २४ वर्षांनी पुन्हा विस्थापिताच दुखणं वाट्याला आलं जेव्हा पूर्व पाकिस्तान हा पाकिस्तानच्या एकूण जाचाला कंटाळून गेला आणि भारताने त्यांची मदत करून १६ डिसेंबर १९७१ मध्ये बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची स्थापना करण्यासाठी युद्ध केलं. भारताने आपल्या वीर जवानांच्या मर्दुमकीने युद्ध जिंकलं पण बंगालवर पुन्हा एकदा विस्थापितांचा भार पडला.

त्यानंतर ३० वर्ष बंगाल हा कम्युनिस्ट राजवटीखाली गुरफटला गेला आणि बंगालच्या तरुणांमध्ये प्रतिभेची भरभराट असतानासुद्धा या भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्टांच्या हातात असलेल्या सत्तेमुळे आर्थिक आणि सामाजिक विकासाची गाडी ही ढकलस्टार्टच राहिली. एकूणच या मरगळलेल्या वातावरणाला जनता कंटाळली आणि त्यांनी त्यावेळी कम्युनिस्टांविरोधात लढणाऱ्या ममता बॅनर्जींच्या हातात “आमार दीदी” म्हणत सत्ता दिली आणि लोकांच्या अपेक्षा या दीदी कडून अतिशय उंचावलेल्या होत्या. पण त्यांनी कम्युनिस्टांविरोधात याआधी प्रदीर्घ लढा दिला होता. कधी कधी ज्या शत्रूशी लढतो त्याचेच “गुण” आपण घेऊन बसतो. असंच काहीसं ममतादीदींचं झालं. कम्युनिस्टांच्या हुकूमशाहीविरुद्ध लढताना त्या स्वतःच कधी हुकूमशहा होऊन गेल्या ते त्यांचं त्यांनाच कळलं नाही.

शारदा चिटफंड असो, रोज वॅली असो सिलीगुरीच्या आराखड्यातला घोटाळा असो, त्यामध्ये तृणमूलच्या बड्या धेंडांची अडकलेली नावं हे याच सत्ताभ्रष्ट हुकूमशाहीचं एक लक्षण. शेतीमध्ये आणि कृषीधोरणाचा पूर्णपणे वाजलेला बोऱ्या तर इतका नीचांकी आहे की त्याची नोंद ही ऋण अंकांमध्ये करावी लागते. द इंडियन एक्स्प्रेसच्या आकडेवारीमध्ये ही संख्या ही -१.४ एवढी दाखवली आहे. म्हणजे चक्क शून्यापेक्षा कमी! तरुण मुलींच्या तस्करीचं प्रमाण हे अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. हे कुठल्या चांगल्या प्रशासनाचं लक्षण आहे कुणास ठाऊक. या सर्वावर कहर म्हणजे ममतांनी यावर केलेला कानाडोळा आणि संपूर्ण दुर्लक्ष. वरून कोणी यावर प्रश्न विचारलाच तर त्यांच्या अंगावर धावून जाणे, जेलमध्ये टाकणे हे प्रकार तर आता बंगालमध्ये “रोजचे मढे त्याला कोण रडे” इतके नित्याचे झाले आहेत. आणि हीच ममतादीदी म्हणे लोकशाही वाचवायला निघाली होती. आहे की नाही उलटी बोंब.

या सगळ्यावर कहर म्हणजे एका विशिष्ट समाजाचं तुष्टीकरण करण्याची तथाकथित “धर्मनिरपेक्ष” राजनीती ही ममतादीदींनीसुद्धा थाटामाटात चालू ठेवली. आणि ती आता इतक्या टोकाला जाऊन पोचली आहे की २०१६ मध्ये चक्क विजयादशमीच्या दिवशी “कायदा आणि सुव्यवस्थेला त्रास होतो” या नावाखाली दुर्गामातेच्या विसर्जनावरच बंदी टाकून बंगालचा आत्मा असलेल्या या हजारो वर्षांच्या परंपरेवर सरळसोटपणे गदाच आणली. यामुळे नक्की कोणाला त्रास होणार होता याचं उत्तर मात्र कधीच ममतादीदींनी दिलं नाही. २०१६ मध्ये मालदाला झालेला दंगा हा डायरेक्ट ऍक्शन डे चा छोटा नमुनाच म्हणावा लागेल. २०१६ हे वर्ष बंगालमध्ये जणू दंगलनाम संवत्सरच होतं. हाजीनगरच्या दंगली, इलम बाजाराचा दंगा, धुळागड आणि कटवाच्या दंगली यांनी बंगालचं एक आख्ख वर्षच दहशतीत घालवलं. २०११ नंतर पुन्हा जनतेने विश्वासाने निवडून दिल्यानंतर २०१६ मध्येच हे सर्व कांड घडल्यामुळे जनतेची घोर निराशा झाली त्यात ममतांनी बंगाल ही जणू आपली खासगी जहागीर असल्याप्रमाणेच एकछत्री अंमल सुरु केला आणि त्यामध्ये खुलेपणाने कट्टरपंथी असलेल्या माणसांना राजाश्रयच देऊन लांगूलचालनाचा कळस गाठला. बीरभूम मध्ये मारुतीच्या मंदिराची तोडफोड करून मारुतीची मूर्ती ही उघड्या रस्त्यावर फेकून देण्यात आली आणि त्याबद्दल सरकारने काहीही केलं नाहीच वरून हिंदू समाजालाच तक्रार कारण्यापासून रोखण्यात आलं. यात मतांची क्षुद्र राजनीती आहे हे समजण्यासाठी कोणत्या पंडिताची गरज नाही. हे उघड्या डोळ्यांनी दिसत असलेलं सत्य आहे.

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर होत असलेले जीवघेणे हल्ले, त्यात कार्यकर्त्यांनी गमावलेला जीव. संघ स्वयंसेवकांवर नजर ठेवून ठरवून झालेले हल्ले हे सर्व असुरी महत्वाकांक्षेचीच साक्ष देतात. नुकतीच मुर्शिदाबाद मध्ये संघ स्वयंसेवक बंधुप्रकाश पाल यांची त्यांच्या परिवारासकट झालेली निर्घृण हत्या हा म्हणजे खुनी प्रवृत्तीचा कळसच आहे. तृणमूलच्या झेंड्यामध्ये लपेटलेल्या या कम्युनिस्ट प्रवृत्तीला आळा घालणं ही आता काळाची गरज बनलेली आहे. काळ सोकावायच्या आगोदरच ह्यावर जागृती होणं गरजेचं आहे. आणि ममता सरकारच्या या निर्मम कारभाराविरोधात हा एकच क्रांतिकारी प्रश्न विचारण्याची गरज आहे जो अत्याचारी रँड आणि त्याच्या महाअत्याचारी प्लेग कमिशनला लोकमान्यांनी आपल्या खणखणीत आवाजात विचारला होता तो म्हणजे… या ममताचे डोके ठिकाणावर आहे काय?

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *