मिठी, अश्रू, आणि पोटशूळ

राहुल रामदास महांगरे

के सिवन यांनी आवरून धरलेला हुंदका मोदी यांना पाहताच अनावर झाला आणि ते देशाचे पंतप्रधान आहेत वगैरे सर्व विसरून इसरो प्रमुख ढसाढसा रडले आणि त्याचवेळेला नेमके आठवले कलाम साहेब. संगणकाने केलेल्या आडकाठीला न जुमानता अग्नी १ मिसाईल प्रक्षेपणानंतर अवघ्या २० सेकंदांमध्ये समुद्रात छिन्नविछिन्न होऊन पडल्यावर तरुण असलेल्या कलामांची सुद्धा अशीच अवस्था झाली होती. तेव्हा त्यांचे बॉस सतीश धवन अतिशय धीरोदात्तपणे परिस्थीतीला आणि पत्रकारांना सामोरे गेले आणि पराभवाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. देशाने पुन्हा याच प्रक्षेपणासाठी डोळ्यात प्राण आणले आणि अग्नी १ यशस्वी झालं. या वेळेला कलाम साहेब पत्रकारांना विजयी होऊन सामोरे गेले. एवढं सगळं सांगण्याचा मुद्दा हाच आहे की, तुमचे वरिष्ठ तुमच्या मागे ठामपणे उभे असतील तर तांत्रिक बाबी थोड्या गौण ठरतात आणि त्यावर मात करताच येते.

यावेळेला मात्र इसरोप्रमुखांच्या भावनेचा बांध फुटला आणि देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या पाठीवर धीराचा हात ठेवला. सांत्वन हा शब्द इथे चुकीचा ठरेल कारण सिंहाच्या औलादींचं सांत्वन कोणी करत नसतं तर त्यांच्या पुढच्या डरकाळीकडे लक्ष द्यायचं असतं. पुढचा पंजा कुठे मारतात हेच पहायचं असतं. इसरो ही भारतरूपी केसरीची आयाळ आहे हे निश्चित. ते यशस्वी होतीलच यात शंका नाही. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला की सिवन साहेब रडलेच कसे. हे त्यांच्यासारख्यांना शोभतं का? विज्ञान क्षेत्रातच शिक्षण झाल्यामुळे एक गोष्ट इथे नमूद करू इच्छितो की ठरलेल्या पद्धतीप्रमाणे (Protocol) प्रमाणे Practical केल्यावरही कधी कधी अपेक्षित result येत नाही यालाच शास्त्रीय भाषेत ”अनाकलनीय” (unexpected or miscellaneous error) म्हणले जाते. (वरील वाक्यातले अनाकलनीय हे शास्त्रीय आहे. राजकीय संदर्भ जोडू नये.) मळलेल्या पायवाटेप्रमाणे पाठ असलेले प्रयोगही बऱ्याचदा फसतात आणि दिवसच्या दिवस वाया जातो. मन खट्टू होतं ते वेगळंच. त्यात ह्या तर अवकाश मोहिमा! अशा गुंतागुंतीच्या मोहिमा जिथे अनेक गोष्टी अजुन शास्त्रज्ञांनाच उलगडल्या नाहीत. अशा ठिकाणी यश आणि अपयश हा हिशेब माणसाच्या हाताबाहेरचाच आहे. नासाच्या ट्वीट मधले पहिलेच वाक्य Space is hard. हे या क्षेत्रातली अनिश्चितता दाखवतं. अशा वेळेला परमेश्वरावरच हवाला ठेवला जातो. ते त्यांच्या कर्मात कुठेही कमी नाहीत. पण जे आपल्या हाताबाहेर आहे त्यासाठी हात जोडायची परवानगी या पुरोगामी नास्तिक चावडीमार्तंडांकडून घ्यायची का?
हाच प्रश्न आहे.

नावडतीचं मीठ अळणी या म्हणीप्रमाणे मोदींनी काहीही केलेलं न पटणारे आहेतच. यांची कोणतीही विचारधारा नसते. विरोध करणे हाच त्यांचा धर्म आणि हीच त्यांची विचारधारा होऊन बसते. मग त्यांनी मारलेली मिठी हासुद्धा यांच्या पोटात पोटशूळ उठवते. आपल्या नावाला नको तितक्या गंभीरतेने घेऊन विश्वंभर चौधरींनी जे अकलेचे तारे तोडलेत त्याला तोडच नाही. ही मंडळी स्वतःच्या मनातले मांडे मोदींच्या नावावर का खातात? हे न उलगडणारं कोडंच आहे. मोदींनी धीर द्यायला त्यांना काय कळतं यातलं? असाही भडीमार त्यांच्यावर झाला. तुम्हाला काय कळालं यातलं हा प्रश्न या मंडळींना विचारला की मग मात्र यांना व्यक्तीस्वातंत्र्याचे झटके येतील. पत्रकार परिषदेत अनावश्यक गोंधळ घालून त्या रिपोर्टरला सुद्धा काय मिळाले हे त्याचे त्यालाच ठाऊक. मात्र मोहिम संपूर्ण यशस्वी झाली नाही यापेक्षा मोदींच्या मिठीचाच पोटशूळ जोरात उठलाय हे नक्की. माणसाची संवेदनशील बाजू दिसल्यावरही त्यावर फुकट राजकारण करणे यातच विरोधाची हतबलता दिसून येते. प्रश्न हाच आहे की, नक्की या पोटशूळाचं credit कोणाला द्यायचं? गरिबीतून आंबे विकून शाळा शिकून इथवर मजल मारणाऱ्या सिवन सरांच्या प्रामाणिक अश्रूंना? नाजूक क्षणी आधाराची गरज असताना सहसंवेदना दाखवणाऱ्या मोदींना? का अशा प्रकारची सहसंवेदना दाखवणारा पंतप्रधान नेमका आपला कट्टर राजकीय विरोधक निघावा याला! सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *