मेट्रो, आरे आणि मुंबईकर


आता आरे प्रकरणावरून पुन्हा एकदा पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे..पर्यावरणाप्रती लोक एवढे सजग आहेत ही चांगली गोष्टं आहे. आता म्हणाल काल तर हा माणूस मेट्रोची बाजू घेत होता. मी आजही मेट्रो व्हावी ह्याच मताचा आहे.

आपण जाणतोच की मुंबईत ट्रॅफिकची समस्या किती जटिल आहे ते. ह्याचं कारण आहे अफाट एकवटलेली लोकसंख्या. बेमर्याद वाढलेल्या गाड्या. आज मुंबईत राहणारा माणूस कामावर ये जा करण्यासाठी कमीतकमी दोन तास खर्च करतो. मी स्वतः चार तास कमीतकमी घालवतो. आताची मेट्रो नसती तर कदाचित अजून एक तास. अंधेरी भाग आणि तिथलं ट्रॅफिक याबाबतीत मुंबईतले लोक जाणतातच. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो. अंधेरीचा पूर्वेकडील भाग म्हणजे साकीनाका, मरोळ, जेबी नगर, चकाला, सीप्झ ह्याभागात मुंबईतल्या सर्वतजास्त it कंपन्या आहेत, शिवाय फायनान्स क्षेत्रातीलही अनेक कंपन्या आहेत. हे कमी म्हणून एयरपोर्टच टर्मिनल २ ही इथेच आहे आणि त्यामुळे असलेली मोठमोठी 5 स्टार हॉटेल्स सुद्धा. हा असला गजबजलेला परीसर. म्हणजे बघा किती ट्रॅफिक असेल. मेट्रो नसतानाचा एक किस्सा सांगतो..मला एका मित्राचा फोन आला “काय रे कुठेस?” मी म्हटलं “साकीनाक्या जवळ, बस मध्ये आहे”…अर्ध्या तासाने त्याचा परत फोन म्हटलं “आता बरोबर साकीनाक्याला”…एवढं भयंकर ट्रॅफिक व्हायचं तिथे .तर हा जो पूर्वेकडील भाग आहे तो अंधेरी आणि कुर्ला/घाटकोपर यांच्या अगदी मध्ये आहे. कोणत्याही रेल्वेस्थानका जवळ नसलेला.
पहिल्या मेट्रोने एक काम चांगलं केलं ते म्हणजे घाटकोपर व अंधेरी वरून लोकांना ह्या मध्य भागात लवकर पोहोचवणं. तरीसुद्धा सीप्झ आणि midc हा महत्वाचा भाग अस्पृश्यच राहिला. म्हणजे मेट्रोतून उतरून पुन्हा रिक्षा हा प्रकार आलाच. त्यात अंधेरीचे रिक्षेवाले हा स्वतंत्र पोस्टचा विषय आहे. त्यामुळे लोकांनी स्वतःच्या गाड्या आणणं काही बंद केलं नाही.

त्यामुळे ह्यावर तोडगा काढणं गरजेचं होतं आणि तो तोडगा म्हणजे “कुलाबा-अंधेरी-सीप्झ” हा मेट्रोमार्ग. दक्षिण मुंबईच्या ज्या भागातून लोकल ट्रेन जात नाही त्या भागातून हा मेट्रोमार्ग जातो. म्हणजे बघा खाजगी वाहतुकीची गरज किती कमी होणार आहे ते. प्रभादेवी, वरळी वगैरे भागातील लोकांना थेट सीप्झ गाठणं किती सोपं होईल..ज्यांना आता आधी बस, मग ट्रेन मग मेट्रो मग पुन्हा बस किंवा रिक्षा असे अनेक सोपस्कार करावे लागत होते किंवा अनेक लिटर पेट्रोलचा चुराडा करावा लागत होता त्यांच्या वेळेची आणि पैशाची व देशाच्या इंधनाची किती बचत होणार आहे ते तुम्हीच बघा.

बरं दुसरा पर्याय न्हवता का? तर होता, तो म्हणजे ह्या भागातले उद्योग धंदे महाराष्ट्रात इतरत्र हलवणे, पण जर तसं केलं असतं तर यापेक्षाही कैक पटीने अधिक मोठं आंदोलन याच लोकांनी केलं असतं. आपल्याकडे हे अॅकटीव्हीस्ट म्हटले जाणारे लोक असतात ना त्यांचा एक प्रॉब्लेम आहे, यांना फक्त प्रश्न विचारायचे असतात त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात यांना कधीच रस नसतो, वर कोणी यांना विचारलंच की बाबारे मग यावर उपाय काय तर हे सांगणार उपाय शोधणं हे सरकारचं काम आहे, मग ह्यांचं काम काय? आलेल्या प्रकल्पाला फक्त विरोध करणे एवढंच आहे का?

बरं ह्यांनी कधी अशा प्रश्नांवर उपाय सांगितले तर ह्यांचीच भूमिका कशी गंमतशीर असते ते पहा. आरे कॉलनीजवळच एक रॉयल पाम्स नावाचा मोठा गृहप्रकल्प आहे, हा जेव्हा उभा राहिला तेव्हा त्याला विरोध झाला नाही बरं का, असो..तर काही पर्यावरण वाद्यांनी MMRC ला ह्या रॉयल पाम्सची जागा मेट्रो कारशेडसाठी अधिग्रहित करावी असा सल्ला दिला, त्याच पर्यावरण वाद्यांनी अवघ्या तीन ते चार महिन्यात आपला पवित्रा बदलला व सांगितलं MMRC ने रॉयल पाम्सची जागा घेऊ नये. आता काय बोलायचं? ह्या ३-४ महिन्यात असं काय झालं की रॉयल पाम्सची जागा यांना प्रिय झाली? ह्या लोकांनी कधी विक्रोळी पार्क साईट येथील डोंगरावर उभ्या राहिलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यां विरुद्ध आवाज उठवला का हो? डोंगराच्या डोंगर पोखरून उभ्या राहिलेल्या पवई विरुद्ध यांनी कधी आवाज उठवला?

मला सर्वसामान्य माणसं जी या आंदोलनात उतरतायत त्यांना सांगायचंय, मेंढरं बनून कशालाही विरोध करू नका, आपण ज्यांच्यावर विश्वास टाकून असली आंदोलनं करतोय त्यांची पार्श्वभूमी तपासा, त्यांचे हेतू लक्षात घ्या. जाताजाता एवढंच सांगू इच्छितो विकास आणि पर्यावरण ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत त्यामुळे त्या दोन्हींचा समतोल राखून आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे, त्यातील एकालाही आंधळा विरोध करून आपण पुढे जाऊ शकत नाही…

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *