
फुरोगाम्यांचे दोन प्रकार आहेत.
एक म्हणजे पारंपारिक फुरोगामी आणि दुसरा नवफुरोगामी.
पारंपारिक फुरोगाम्यांची वैशिष्ट्य आपल्याला बऱ्यापैकी ज्ञात झालेली आहेत ती पुढीलप्रमाणे सांगता येतील.
- जे काही “हिंदू” म्हणून आहे ते सर्वच्या सर्व टाकाऊ, बुरसटलेलं, प्रतिगामी आणि जे काही पाश्चात्य आहे ते सर्वच्या सर्व अनुकरणीय, पुरोगामी आहे.
- पारंपारिक फुरोगाम्यांचे दुसरे वैशिष्ट्य असं कि, हिंदुत्व ही काही विचारधारा किंवा तत्वज्ञान नसून केवळ चातुर्वर्ण्य, जातव्यवस्था, अस्पृश्यता आणि महिलांना स्वातंत्र्य नाकारणारी व्यवस्था आहे.
- त्यांच्या मते या देशात इस्लामिक कट्टरतावाद नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही आणि ते केवळ सांप्रदायिक/जातीवादी हिंदुत्ववाद्यांनी उभे केलेलं भूत आहे.
- समाजवादी/साम्यवादी अर्थव्यवस्था हीच एकमेव आणि शाश्वत अशी व्यवस्था असून त्यापेक्षा वेगळ्या व्यवस्थेचा पुरस्कार कराल तर तुम्ही दलित, शोषित, वंचितांचे शत्रू आहात आणि शोषक वर्गाचे पाठीराखे आहात.
आता हा “नवफुरोगामी” काय प्रकार आहे आणि त्याची काय वैशिष्ट्य आहेत ते पाहू.
- ज्या क्षणी तुम्ही असा दावा कराल कि हिंदू संस्कृती/सभ्यता ही समृद्धशाली राहिलेली असून तिला गौरवशाली इतिहास आणि वैभवशाली वैज्ञानिक परंपरेचा वारसा आहे, त्याच क्षणी ह्या नवफुरोगाम्यांच्या डोक्याला झिणझिण्या येतात आणि बोकड शिसारी दिल्यागत यांची अवस्था होते. या बाबतीत ते पारंपारिक फुरोगाम्यांपेक्षा वेगळे नाहीत.
- “कृतिशील आणि संघटित हिंदू” जो हिंदुत्वाचा विचार सांगतो तो यांच्या मते प्रतिगामी, छद्म-वैज्ञानिक आणि अविवेकी असतो. इथेही ते पारंपारिक फुरोगाम्यांच्या बरोबरीने आहेत.
नवफुरोगामी हा पारंपारिक फुरोगाम्यांपेक्षा वेगळा आहे तो पुढील दोन बाबतीत.
- आर्थिक व्यवस्थेसंदर्भात हा समाजवाद्यांना/साम्यवाद्यांना तिव्र विरोध दर्शवतो पण भांडवलशाही व्यवस्थेचा पुरस्कार खुद्ध भांडवलशाही राष्ट्रापेक्षाही अधिक जोमाने करतो.
- देशात इस्लामिक कट्टरतावाद आहे हे याला मान्य असते. त्याला प्रखर शाब्दिक विरोधही दर्शवतो.
वर उल्लेखलेल्या दोन विषयात नवफुरोगामी हे पारंपारिक फुरोगाम्यांपेक्षा वेगळे जरी दिसत असले तरी त्या संदर्भात ते कृतीशून्य असतात. केवळ कृतीशून्यच असतात असे नाही, तर संधी मिळेल तेंव्हा कृतिशील हिंदुत्ववाद्यांचा उपहास करायला पारंपारिक फुरोगाम्यांपेक्षाही दोन पावले पुढे असतात.
पारंपारिक फुरोगाम्यांपेक्षा नवफुरोगामी जास्त घातक आहेत.
याचे कारण म्हणजे नवफुरोगामी हे स्वतः:ला हिंदुत्ववादी म्हणवतात पण त्यांच्यात हिंदुत्व-भारतीयत्व म्हणता येईल असं काहीही नाही. संभाजी ब्रिगेड, बामसेफ यासारख्या ज्या फुटीरतावादी, जातीवादी संघटना आहेत, त्यांनी हिंदू समाजाला जागृत व संघटित करणाऱ्या व्यक्तींना लक्ष करण्याचे ठरवलेले आहे, जेणेकरून या प्रमुख कार्यकर्त्यांची विश्वसार्हता जर संपवली तर हिंदुत्ववादी चळवळ मोडीत काढून फुटीरतावादी चळवळ रुजवणे सोपे होईल. त्यामुळे नवफुरोगामी जेंव्हा एखाद्या सिनेमात आयटम सॉंग शोभेल अशा प्रकारचे मनोरंजनात्मक व टाळ्या मीळवणारे लिखाण करतात तेंव्हा ब्रेगेड-बामसेफचे काम सोपे होत असते.
नवफुरोगाम्यांना हिंदुत्ववादी किंवा भारतीयत्ववादी म्हणता येणार नाही. मुळात नवफुरोगाम्यांना भारतीय संस्कृती-सभ्यता, त्याची वैशिष्ट्य, समृद्ध वारसा याविषयी कवडीचे ज्ञान नसते. पण त्यांनी आपलं अज्ञान दूर करण्या ऐवजी त्या अज्ञानाला आकर्षक आवरणात अविष्टीत करून त्यालाच आभूषण म्हणून मिरवण्याचा पर्याय निवडलेला आहे. त्यांच्याकरिता नवफुरोगामी हेच संबोधन अधिक संयुक्तिक राहील. कारण केवळ डावी विचारसरणी व इस्लामिक कट्टरतावादाच्या विरोधी असणे म्हणजे भारतीयतावादी असणे असं नाही. जेंव्हा विरोध करायला डावेही शिल्लक राहणार नाहीत आणि इस्लामिक कट्टरतावादही शिल्लक राहणार नाही तेंव्हा यांच्या तत्वज्ञानात केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथुन याव्यतिरिक्त विशेष काहीच उरत नाही.
नवफुरोगाम्यांची प्रमुख समस्या अशी आहे कि, त्यांच्या मते सेमेटिक पंथांचा अभ्यास केवळ त्यांनीच केलेला असून इतरांना, म्हणजे हिंदुत्ववाद्यांना सेमिटिक पंथांच्या कट्टरतेची समस्या, विशेषतः इस्लामिक कट्टरतावादाची समस्या ही कळलेलीच नाही. आता हिंदुत्ववाद्यांनी सुरुवातीच्या काळात हिंदू समाजाला संघटित करण्याचे जे कार्य सुरु केले त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे “सेमेटिक पंथांचा संघटित आक्रमकपणा” हे होते, हे नवफुरोगाम्यांना माहिती असल्याचे दिसत नाही. कारण हिंदुत्ववादी नवफुरोगाम्यांप्रमाणे केवळ समस्या असल्याचं रडगाणे गात बसत नाहीत, तर प्रत्येक्ष उपाययोजनेवर कार्य करीत असतात.
नवफुरोगाम्यांचा हिंदू संस्कृती-सभ्यतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा, हिंदू हि विशेष अशी काही संस्कृती-सभ्यता नसून तोही एक प्रकारचा प्रतिगामी पंथ-संप्रदाय असल्याचे ते मानतात. विरोधाभास म्हणजे ज्या सेमेटिक पंथांच्या कट्टरतेविषयी हे गळे काढतात, त्याप्रकारचे सेमेटिक पंथ भारतीय सभ्यतेत का निर्माण होऊ शकले नाहीत, त्यामागे काय कारण असेल याचा शोध घेण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत आणि भारतीय संस्कृती-सभ्यतेत काहीही “भारी” नसल्याचा निर्वाळा देऊन मोकळे होतात. भारतीय संस्कृती उदार, उपासना स्वातंत्र मानणारी, सर्वसमावेशक का आहे, विविध मत-संप्रदाय असूनही त्यात एक प्रकारचा समन्वय कसा दिसून येतो याचा शोध ते घेत नाहीत, कारण शोध घ्यायचा तर त्याचा अभ्यास करावा लागतो, तंगड्या वर करून झोपा काढणाऱ्यांना ते कसे कळेल?
हिंदू समाज हा सेमेटिक पंथांच्या कट्टरता व अतिरेकी डाव्या चळवळीच्या समस्येमुळे तो देशाच्या एकता-अखंडता याविषयी चिंतीत आहे. त्यामुळे जो कुणी या समस्येवर प्रखरतेने बोलतो त्याला तो पूर्ण पाठिंबा देतो. त्याची इतर बाबतीत काय मते आहेत हे फार तपासण्याच्या भानगडीत तो पडत नाही. आणि म्हणून नवफुरोगाम्यांकडून त्याचा सहज बुद्धिभेद होऊ शकतो. एका बाजूला, ज्या सांस्कृतिक वैशिष्ट्यामुळे हिंदू समाज कोणत्याही कट्टरतेच्या समस्येचा भाग नाही, त्या हिंदू समाजाला त्याच्यासमोर इतरांनी उभ्या केलेल्या कट्टरतेच्या समस्येचा विरोध केल्याचे दाखवायचे आणि दुसऱ्या बाजूला त्याच सांस्कृतिक वैशिष्ट्याला दुर्लक्षून त्यात काहीच “भारी” नसल्याचे सांगायचे, हा उथळपणा नवफुरोगाम्यांनाच शोभून दिसतो आणि हाच उथळपणा त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे.
मी या लेखात हिन्दू संस्कृतिची वैशिष्ट्य उदार, सर्वसमावेशक, सहिष्णुता व स्वीकार्यता असल्याचे म्हटले आहे, पण ती तशी असण्यामागची कारणमीमांसा केलेली नाही. ज्यांना या संस्कृतित काहीच भारी असल्याचे वाटत नाही त्या नवफुरोगाम्यांनी नुसतं तंगडया वर करून झोपा न काढता ते शोधावे आणी आपलं अज्ञान गोंजारत न बसता ज्ञानाचा दिवा लावून सच्चिदानंद व्हावे.
No Comment