आजचा तरुण — बंडासाठी बंड करणारा अविवेकी बंडखोर का सर्जनशील कर्मयोगी?


जेंव्हा माणूस आपल्या वयाचे साधारण 18-20 वर्ष पूर्ण करुन पुढे जातो, तेंव्हा तो मानवाच्या अगदी नैसर्गिक स्वभावानूसार आपल्या भोवतालच्या समाजाविषयी, परिस्थितिविषयी विचार करायला लागतो. असं होणे, हे त्याची विचार क्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने आणि भोवतालची निसर्ग सृष्टि, त्यातील मानवी सभ्यता, योग्य-अयोग्य गोष्टी, त्यामागचे कार्यकारणभाव हे सर्व चांगल्या पद्धतीने समजून घेवून त्यात आपल्या आस्तित्वाचा अर्थ आणि जीवनाचे प्रयोजन याविषयीचा साक्षात्कार होण्यास फार महत्वाचे असते. पण आयुष्याच्या या टप्प्यावर काळजीही तितकीच घ्यावी लागते. “आता मला खुप काही समजायला लागले आहे, आणि आजुबाजुच्या प्रत्येक गोष्टिवर मी अधिकार वाणीने बोलू शकतो” हा भाव मनात येणे आणी कुठल्याही विषयाचा सारासार विचार न करता सरळ निष्कर्षापर्यँत पोहोचण्याच्या घाईत उथळ मत मांडणे ही वृत्ती माणसाच्या विकास प्रक्रियेला फार मोठा अडथळा ठरते. केवळ बौद्धिक कुतूहल असणे पुरेसे नाही, त्यासोबत स्वच्छ विचार करण्याची क्षमता असणे त्यापेक्षाही जास्त महत्वाचे आहे.

कोणत्याही गोष्टीविषयीं जाणून घेण्याची एक पद्धत्त असते. सर्व प्रथम एखादा विषय जेंव्हा आपल्या निदर्शनास येतो तेंव्हा तत्काळ आपण आपले अनुभव व आकलनबुद्धीनुसार त्याविषयीचे एक प्राथमिक मत बनवतो. ह्या प्राथमिक मतानुसार ताबडतोब कोणतीही सकारात्मक वा नकारात्मक प्रतिक्रिया देऊ नये. त्या विषयात अजुन विविध स्वरूपाची माहिती, भाष्य, सकारात्मक-नकारात्मक असे सर्व प्रकारचे दृष्टिकोन काय आहेत, ते एकत्रित करावे, वाचावे-ऐकावे, नंतर स्वत:च्या अंत:प्रेरणेतून या विषयी चिंतन करावे आणी मगच आपले मत बनवावे. या सर्व प्रक्रियेनंतरही जे आपले मत बनते ते सुद्धा फार घट्ट-कट्टर होता कामा नये याची काळजी घ्यावी लागते. याचा अर्थ असा नाही की आपल्याला स्वत:चा असा काही विचार, भूमिका असूच नये, तो जरूर असावा पण सारासार चिंतनांती तयार झालेला असावा आणी त्यात फार ताठरता-कट्टरता येवू नये.

तरुणांचा विषय निघाला की बऱ्याचदा असे म्हटले जाते की “बंडखोर वृत्ती हे तरुणाईचे लक्षण आहे”. मला अजूनही आठवत नाही की हे वाक्य पहिल्यांदा कधी ऐकले-वाचले आहे. पण सतत एखाद्या फैशन स्टेटमेंट सारख हे वाक्य आजच्या तरुणाईच्या बाबतीत ऐकिवात येते. माझ्या मते ह्या वाक्याने बराच घोळ केलेला आहे. हे वाक्य एका विशिष्ट संदर्भात योग्य असू शकेल, पण बहुतांश तरुणांनी हे एखाद्या शाश्वत विचाराप्रमाणे घेतलेले दिसते. यामुळे त्यांच्यावर नकळत एक असा संस्कार होतो की तरुणाईची ऊर्जा ही कसलेतरी बंड करण्यासाठीच लावायची असते. मग बंड तर करायचे आहे हे निश्चित होते. मग कसला बंड आणी कशाच्या विरोधात हा प्रश्न उभा राहतो, आणि इथे योग्य मार्गदर्शन अथवा पुरेपुर विचार न केल्यामुळे होतो तो केवळ “बंडासाठी बंड”. मग आपल्या अवती-भोवती जे काही संस्कृति, परंपराच्या रूपाने सर्वमान्य असलेल्या गोष्टी दिसतात त्याची योग्य ती कारणमीमांसा न करता चालू होतो तो बंडासाठी बंड. आपल्याकडे मागचे दोन-तीन शतके हे अनेक सामाजिक सुधारणा व साम्राज्यवादी परकीय शक्तीच्या गुलामीतुन मुक्त होण्यासाठीच्या राजकीय स्वातंत्र्य चळवळीचे राहिले आहेत. त्या काळातील परिस्थितिमुळे आपल्या देशात अनेक सामाजिक सुधारणावादी तसेच राजकीय स्वातंत्र्याकरिता लढणारे नेते उभे राहिले ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आपल्याला सामाजिक व राजकीय असे दोन्ही प्रकारचे स्वातंत्र मिळाले. एका अर्थाने सामाजिक सुधारणा हा निरंतर चालणारा विषय जरी असला तरी आज त्या बाबतीत आपण बरेच पुढे आलेलो आहोत. आजच्या तरुण पिढीसमोर जे आदर्श हीरो आहेत ते प्रामुख्याने वर उल्लेख केलेल्या चळवळीतील आहेत, ज्यांनी त्या विशिष्ट परिस्थितित तत्कालीन सामाजिक व राजकीय व्यवस्थेविरुद्ध बंड केले होते, जे कालानुरूप योग्य होते. आपण आज त्यांचं राष्ट्रपुरुष या नात्याने स्मरण करतो, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो जे अगदी स्वाभाविक आहे. पण आजच्या तरुण पीढिने हे लक्षात घ्यायला हवे की आजच्या स्थितीत आणी त्या काळातील स्थितीत खुप फरक आहे. त्यामुळे तात्कालीन नेत्यांनी जे केले तशाच पद्धत्तिचे कार्य आता करण्याची आवश्यकता नाही. समाज सुधारण्याचे काही प्रश्न जरूर आहेत पण सुदैवाने ते निश्चितच पूर्वी होते तसे नाहीत आणी असहकार, कायदेभंग, जाळ-पोळ, राज्यव्यवस्थे विरुद्ध बंड करायला आपण आता परकीय राजवटीत नाहीत. आता आपण स्वतंत्र आहोत आणि हे आपले स्वराज्य आहे, त्यामुळे आता खरी गरज आहे ती सर्जनशील कार्यातून राष्ट्र उभारणी करण्याची. पारतंत्र्याच्या काळात समाज व देशासाठी कार्य केलेल्या महामानवांपासून प्रेरणा घेवून त्यांच्या स्वप्नातील राष्ट्र निर्मितिसाठी कार्यप्रवण व्हावे लागेल. प्रेरणेच्या पुढे जावून आपण पारतंत्र्याच्या काळात सुसंगत कार्यपद्धति अवलंबली तर ते केवळ “बंडासाठी बंड” होईल. आणि एकदा “बंडासाठी बंड” ही वृत्ती रुजल्यानंतर त्याचा वापर करण्यासाठी काही समाजकंटक आपल्या राजकिय – सामाजिक स्वार्थासाठी जाळे टाकून बसलेले असतात आणि अचुकपने आपल्या जाळ्यात ओढतात. किंबहुना तरुणाईला त्यांच्या जाळ्यात ओढण्यासाठीच “बंडखोर वृत्ती हे तरुणाईचे लक्षण” इथपासुन ते सुरुवात करीत असावेत.

आज मानवी इतिहासात कधी नव्हे इतकी विविध प्रकारची माध्यमं उपलब्ध झालेली आहेत. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मेडियासोबच सोशल मीडियावर ऑडियो-वीडियो स्वरुपात आपल्यावर वेगवेगळ्या कल्पना, विचारप्रणाली, कथित एतिहासिक माहिती यांचा वारंवार आपल्यावर मारा केला जातो. त्यापैकी काय स्वीकार्य आहे आणि काय त्याज्य आहे हे आपल्याला समजले पाहिजे, त्यांचे चिकित्सक दृष्टीने योग्य मूल्यमापन करता आले पाहिजे.

एका बाजूला आपली शिक्षण व्यवस्था तरुण पिढीमध्ये ज्याप्रकारे अनाठायी बंडखोर वृत्ती रुजवते त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला यूरोप-अमेरिकेविषयी स्वर्गमयी चित्र उभे करते. म्हणूनच आजच्या आपल्या तरुण पिढीचे सर्वोच्च ध्येय म्हणजे “जीवनात एकदा तरी यूरोप-अमेरिकेची वारी करणे” इतके ते संकुचित झाले आहे. आता जग फिरण्याची, विविध गोष्टी जाणून घेण्याची, आपलं अनुभव विश्व विस्तारण्याची उत्सुकता असणे स्वाभाविक, योग्य आणि माणसाला सम्पन्न करणारे असते. पण आपल्या तरुण पीढिमध्ये परदेशात जाण्याच्या उत्सुकतेसोबत स्वदेशाविषयीं कसलितरी न्यूनगंडाची आणी तिरस्काराची भावना जुडलेली जाणवते. ज्या देशांना आज जगात “विकसीत” देश म्हटले जाते (कोणत्या दृष्टीने विकसित आणी “विकास” या परिभाषेविषयी वेगळा विचार करावा लागेल) त्या देशातील तरुणही जगभर जातात पण त्यांच्या त्या भ्रमंतीला स्वदेशा विषयी नकारात्मकता नसते.

आपली समाज व्यवस्था व शिक्षण पद्धती, ज्यामुळे माणसाची जड़ण-घडण होते त्या व्यवस्थेत काहीतरी महत्त्वाची अशी कमतरता आहे. आपण जर देशातील नुकतेच तारुण्यात आलेली पीढ़ी पाहिली तर त्यातील सर्व नाही, पण बहुतांश तरुण-तरुणीमध्ये देशाची संस्कृति, परंपरा, इतिहास या विषयी एक प्रकारचा तिटकारा निर्माण झालेला असतो. देशभरात, अगदी दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यापर्यंत शिक्षण व्यवथेचे मोठे जाळे निर्माण झालेले आहे. पण या व्यवस्थेचं प्रोडक्ट म्हणून बाहेर पडणारी जी तरुण पीढ़ी आहे ती कशी आहे? स्वत:पुढच्या आणि देशापुढच्या समस्यांविषयीं विचार करण्याची क्षमता निर्माण झाली आहे का? त्यावर उपाय शोधत असताना योग्य निर्णय करता यावा याकरिता इतिहासाचे योग्य आकलन झाले आहे का? वैभवशाली परंपरा याविषयी मनात गौरवाचा भाव उत्पन्न झाला आहे का? वर्तमान स्थितिविषयी यथार्थ जाणीव आणी राष्ट्राच्या उज्जवल भवितव्यासाठी कृतिशील होण्याची उत्कट प्रेरणा निर्माण झालेली आहे का? दुर्दैवाने म्हणावे लागते की आपली शिक्षण व्यवस्था हे साध्य करू शकली नाही.

अशी परिस्थिति कुठल्याही राष्ट्राच्या बाबतीत निर्माण होणे हे त्या राष्ट्राच्या भावितव्याच्या दृष्टीने फारच दुर्दैवी असते, आणि आपल्या राष्ट्रासाठी ज्याला अजून फार मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे त्याला ह्या परस्थितीची कारणमीमांसा करणे फार गरजेचे आहे. ज्याप्रमाणे एखादी गाड़ी इंधनऊर्जेशिवाय किंचितही पुढे जावू शकत नाही त्याप्रमाणे कोणतेही राष्ट्र आपला गौरवशाली वारसा व समृद्ध परंपरा याची अवहेलना करुन प्रगतिच्या रुळावर वेगाने धावू शकत नाही.
त्यामुळे समृद्ध व समर्थ राष्ट्र निर्मितीसाठी आपली समाज व्यवस्था विवेक बुद्धीचा अभाव असलेली बंडखोर तरुण पिढी निर्माण करणारी नाही, तर इतिहासाचे यथार्थ आकलन , आपल्या समृद्ध वारशाप्रति स्वाभिमान, वर्तमानाची पुरेपूर जाणीव आणि उज्वल भविष्याची आस असलेला , राष्ट्राला प्रगतीपथावर अग्रेसर नेणारा सर्जनशील कर्मयोगी निर्माण करणारी असायला हवी.

— भरत ए

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *